अनंत रूपातील रणरागिणी…. स्त्रीशक्ती ……”

Spread the love

तुझ्या गगनचुंबी भरारी पुढे क्षितिजही ठेंगणे भासावे..
तुझ्या छत्रछायेखाली
मोकळे आकाशही वसावे..!!

धाराशिव योद्धा
(वृत्तसेवा-हनुमंत पाटुळे)

स्त्रियांच्या जगण्याचा हक्क अबाधित ठेवण्याचा लढा म्हणजे 8 मार्च होय.सशक्त स्त्रियांच्या भरारीची यशोगाथा म्हणजे जागतिक महिला दिन होय. जागतिक स्तरावर महिलांचा शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक ,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव साजरा करण्यासाठी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक घराची आन-बान- शान म्हणून जिचा गौरव होतो ती घरची लक्ष्मी म्हणजेच स्त्री. आज कुटुंबच नव्हे तर जिने संपूर्ण विश्व आपल्या कवेत घेतले आहे अशी स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे नाही .स्वप्नांना पंख लावून ती प्रत्येक ठिकाणी आपल्या यशाचा ठसा उमटवत आहे . घराची व मुलांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे.” *किती गाऊ मी गोडवे स्त्रीपणाचे, ……..
जिच्यामध्ये दडले आहे पर्व इतिहास घडविण्याचे”….. .छोट्या छोट्या संकटापासून ते मोठ्या मोठ्या संघर्षापर्यंतच्या लढ्यात ती उतरत आहे. अशा महिलांचा निश्चितच आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आज एका बाजूने आपण पाहीले तर महिला खूप विकसित झाल्या आहेत. पण, दुसरी बाजू पाहिली तर आजही महिलांमध्ये कमालीचे अज्ञान ,अंधश्रद्धा , निरक्षरता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते .आज हातात मोबाईल येणे हे तंत्रज्ञानाचे प्रतीक नक्कीच आहे. मात्र , मोबाईलचा अती वापर हे नात्यातील गोडवा नाहीसा करून विसंगती निर्माण करते याचीही सुज्ञ पालक म्हणून आपल्याला जाण असलीच पाहिजे.” स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत*
आज तरी काय फरक आहे ?*
जीवन पिळून काढण्यासाठी
रोज नवा चरख आहे…….”*असे म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आली असे म्हटले तर वावगे नाही .कारण आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी आजही काही भागात महिलांनी चूल आणि मूल यामध्ये स्वतःला कोंडून घेतले आहे. कोण काढणार त्यांना यातून बाहेर ? याचे एकच उत्तर ते म्हणजे “शिक्षण”.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोऊन महिलांना अज्ञानातून बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न केले. त्यांचा वारसा आपण चालवला पाहिजे.
आज ही घराघरात जिजाऊ आणि सावू घडली जाऊ शकते. त्यासाठी गरज आहे की तिला घडविणाऱ्या हातांची ,विचारांची व मानसिकतेची, मुलींना एका निर्भिड वातावरणात वाढविण्याची.
पूर्वीपासून आपल्या समाजात देवींना उच्च स्थान आहे. जेवढे देव,तेवढेच देवींना मानणारा माझा समाज ,कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर सरस्वतीला, देवींना पूजणारा माझा समाज ,देवीच्या पुढे पापाचा नाश कर म्हणून लोटांगण घेणारा माझे समाज, जेव्हा स्त्रीभ्रूणाचा गर्भातच बळी घेतो तेव्हा मनाला एक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.” जन्म घेतला जा आईच्या पोटी ….
तिरस्कार का त्याच स्त्री जातीचा?
उपयोग काय मग या आपल्या महामानवांच्या क्रांतीचा ?
घेतला जातो एका चिमुकलीचा जन्माला येण्याआधीच बळी ……
मग तुम्हीच सांगा कशी घडेल जिजा आणि कशी घडेल सावित्रीबाई ????
कशी घडेल सावित्रीबाई ??”स्त्रीभ्रूनाला गर्भातच मारण्यासाठी अनेक षडयंत्र रचले जात आहेत .एका चिमुकल्या, निरागस अशा जीवाला संपवताना विचार करून बघा ,जिच्यामुळे आज आपण श्वास घेत आहोत तिचा श्वास संपवण्यासाठीच तुम्ही धडपडत आहात .काय चुकले तिचे ?ती स्त्री आहे ही तिची चूक आहे का ?तुम्हीच सांगा. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्याची सुरुवात आज ,आत्तापासून होणे गरजेचे आहे.” विद्या ,पुनम ,अमृता, निर्भयाचे …..
बळी घेतले रस्त्यावर भरदिनी ….. त्याची आठवण होते आम्हा ……
फक्त जागतिक महिला दिनी….. “आजही काही ठिकाणी महिलांवरती अन्याय अत्याचार होताना आपण पाहतो .किती दिवस आपण पीडित महिलांना श्रद्धांजली वाहून गप्प बसणार? ही एक लढाई आहे ,अत्याचारा विरोधाची .आपण सगळ्यांनी या लढाईत सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या शारीरिक क्षमता विकासाकडे लक्ष दिले पाहिजे .आपल्या घरातूनच याची सुरुवात करून मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम तर बनवूच पण आपल्या वंशाचा दिवा म्हणजे आपला मुलगा त्यालाही स्त्रियांचा आदर करण्याचे शिक्षण दिले पाहिजे .स्त्रियांचा सन्मान करण्याचे धडे घरातूनच मिळाले तर आपली भावी पिढी उज्वल आणि संस्कारक्षम बनल्या शिवाय राहणार नाही व समाजात अशा अमानवीय घटनांना आळा बसेल……
शेवटी एक त्रिकाल बाधित सत्य उरते. ते म्हणजे……..
स्वतंत्र भारताची मूर्ती घडविण्याचे सामर्थ्य एका स्त्रीमध्ये आहे. गगनाला गवसनी घालण्याची शक्ती एका स्त्रीमध्ये आहे .आकाशातील तळपता तारा होण्याचे तेज एका स्त्रीमध्ये आहे. झऱ्याच्या खळखळणाऱ्या प्रवाहासोबत पोहण्याची ताकद एका स्त्रीमध्ये आहे .पहाटेच्या गर्द काळोखात वाट दाखवण्याची हिंमत एका स्त्रीमध्ये आहे. चंदनाप्रमाणे झिजून काबाड कष्ट करण्याची जिद्द एका स्त्रीमध्ये आहे. सागराला अचंबित करणाऱ्या लाटांची शक्ती एका स्त्रीमध्ये आहे. हास्य हे जीवन वृक्षाचे फुल असून ते फुलवण्याची गोडी एका स्त्रीमध्ये आहे .बाळ तुला लागलं तर नाही ना असं म्हणून ह्रदय पिळवटून टाकणार काळीज एका स्त्रीमध्ये आहे. मरणालाही यमसदनी पाठवून काळाला हुलकावणी देण्याचे धाडस फक्त आणि फक्त एका स्त्रीमध्येच आहे….!!श्रीम.रोहिणी बबन माने(प्रा. शि.)
जि. प.प्रा शा. खामसवाडी
तालुका -कळंब ,
जिल्हा -धाराशिव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *